तिच्या नजरेतून जग पाहताना
'ती' माझ्या जीवनात आली आणि माझा पुनर्जन्म झाला. तिच्या जन्माने मी पूर्ण झाले. आईचं 'आईपण' बाळाच्या जन्मानेच समृद्ध होतं, यात नवीन ते काय ? हो ना? पण नवीन असते हे जग- त्या अर्भकाला. आईला जाऊन बसावं लागतं त्याच्या हृदयात, डोळ्यात आणि मग सुरु होतो प्रवास मानवी जीवनाचा . एका नव्या जगात दोघांचाही . "आई" ..नुसतं आई म्हटलं तरी किती सुख आहेना? तिच्या नावात ,तिच्या स्पर्शात, तिच्या प्रत्येक शब्दात . 'ती' असते सर्वस्व तिच्या बाळासाठी आणि आईसाठीही. 'आद्या ' , नामकरण झालं. आद्या म्हणजे सुरुवात ,प्रारंभ, विश्वाची जननी . ती गर्भात असल्यापासूनच शांत .तेव्हापासूतनच तिने मला साथ द्यायला सुरुवात केली . आमची दोघींचीही जिवाभावाची मैत्री. सोबत हसावं, सोबत रडावं, सारं काही संगतीने. आज दहावीचा निकाल आला आणि माझ्या मनाची चाकं मागे फिरू लागली. खूप दिवसांची हातात येऊ पाहणारी लेखणी आज हातात घेण्याचा मोह आवरला नाही .आजवर अनेक विषयांवर लिहावं, बोलवं, व्यक्त व्हावं , असं वाटायचं. अनेक विषय( मानसिक, सामाजिक, कौटुंबिक संबंध विषयक), अनेक titles मानसपटलावर येत गेले, त्यावर मनातल्या मनात लिखाणही झालं. परंतु पेन आणि डायरी घेऊन 'निवांत' लिहीत बसावं , एकेक प्रसंग वा मनोगत शब्दात मांडवा असा प्रपंच काही होईना. तो निवांतपणा आजतागायत कधी मिळालाच नाही. आज आद्यानेच ते घडवून आणलं असं म्हणावं लागेल .आज मला (थोडंसं) मोठ्याने ओरडून सांगावं वाटतंय की .... 'आद्याऽऽऽ यु आर द बेस्ट !' दहावीला 95 %गुण मिळविले म्हणून नाही, कदापि नाही ,परंतु हो ,.. 95 % मिळाविलेस, Yes, This is the day! I'm proud of You my dear , तू मला जे दिलं ते प्रत्येक आई-बाबांना हवं असतं. आपल्या मुलांचे यश हे प्रत्येकाचं स्वप्न असतं . आपल्या मुलाने परीक्षेत छान गुण मिळवावेत..... माझंही होतं. पण गुणांची अट नव्हती. 'परीक्षा..'. जन्मभर परीक्षा तर असते.... जन्माला आल्याबरोबर पहिला श्वास घेण्यापासून ते अगदी शेवटच्या श्वास जाईपर्यंत. जीवनाच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर परीक्षा. स्त्री म्हटल्यावर अधिकच. मग आपण प्रत्येक परीक्षेत टेन्शन घेत राहिलो तर आयुष्य जगायचं कधी? आज माझं हे मनोगत म्हणजे माझा स्वतःचा स्वत:शी आणि माझ्यासारख्या सर्व पालकांशी मी साधत असणारा संवाद आहे मुलांना वाढवीत असताना आपण नेहमी आपल्याच डोळ्यांनी,आपल्या चष्म्यातून त्यांना पाहत असतो .असं नेहमीच होत राहिलं तर हा One way मग एकाच दिशेने जातो .म्हणून मला असं वाटतं की आपण मुलांकडे पाहताना त्यांच्या नजरेतून पहावं .आपल्याकडे आणि जगाकडे ही आणि मग बघा कशी मजा येते त्यांचा निरागसपणा ,स्वच्छ निर्मळ वृत्ती, सहजता भावनिकता, उत्साह आपल्याला दिसायला लागतं ( सोबत आपले दोषही). तिच्या नजरेतून पाहताना मला नेहमी माझे बालपण आठवायचे.न राहवून दोन प्रसंग सांगावे वाटतात.एक ....पहाटे चार वाजता आईच्या सडयाच्या बादलीचा आवाज आला की तिच्या सोबत सडा-रांगोळी काढण्यासाठी उठून मग भावंडांसोबत अभ्यास करायला बसायचे आणि दुसरा ,वार्षिक परीक्षेचा निकाल हातात आला की तात्यांची (वडिलांची) पप्पी घ्यायचे.(शेंडेफळ असल्याचा फायदा). बालपणीच्या आठवणी सांगाव्या तेवढ्या थोड्याच. मग आपण ह्या मुलांनाही अशा आठवणी का ठेवू नयेत? ज्या त्यांना ते पालक झाल्यावर आपल्या मुलांसोबत वाटता येतील. तेव्हा मुलांशी संवाद साधताना किंवा गप्पा मारताना कोणत्या विषयावर बोलावे? असा प्रश्न पडणार नाही.(जो आज बऱ्याच पालकांसमोर असतो). आद्याला वाढविताना मी स्वतः पण खूप जगून घेतलं. ती दीड वर्षांची असल्यापासून शाळा शोधायला सुरुवात केली. बालवाडी मराठी माध्यमातूनच करायची हे निश्चित होतं .कारण मुलांच्या मानसिक विकासाचा पहिला टप्पा मातृभाषेतून पक्का झाला तर तो पुढील जीवनाची इमारत घडवतो. घराजवळच (योगायोगाने )असलेली अतिशय सुंदर अशी बालवाडी ओंकार बालवाडी आद्याची पहिली शाळा. ओंकार बालवाडी असं म्हटलं तरी नुसत्या आठवणीने डोळ्यात अश्रू तरळतात.आता या क्षणीही माझे डोळे भरून आले आहेत .अशी ही शाळा,,, .शाळा नाही तर घर . आईचं प्रेम देणाऱ्या तिथल्या सगळ्या ताई (शिक्षिका )आणि तिथलं वातावरण आहा...!जसा विचार मी केला होता अगदी तशीच... स्वप्नातील शाळा .अाद्याचं बालपण समृद्ध करणारं असं हे तिचं आवडतं घर.( त्यावर एक स्वतंत्र लिखाण होईल असं.) प्राथमिक टप्पा पूर्ण होत असतानाच पुढील संशोधन सुरू झालं आणि दुसऱ्या घराचा शोध लागला . Tender Care Home आद्याचं नवीन घर .तितकाच सुंदर ,तितकच भावणारं,आपलंसं वाटणारं, थोडंसं मोठं... मुलांना शाळेत घालताना शक्यतो दहावीपर्यंत शाळा बदलू नये ,असा विचार मनात ठेवून निर्णय घेतला आणि सुदैवाने Tender Care Home सापडलं. अहो, सापडलं म्हणजे... मुलांसाठी शाळेची शोधाशोध काय असतं हे आता वेगळे सांगायला नको.. तर तिचा पुढचा प्रवास सुरु झाला आणि माझा जीव भांड्यात पडला .डोळे झाकून विश्वास ठेवणे एवढ्या विश्वासास पात्र असे हे नवीन घर तिने आपलेसे केले आणि तिलाही घराने. मराठी माध्यम की इंग्रजी असा गोंधळ मनात ठेवून शेवटी Tender Care Home च्या Philosophy शी मन एकरुप झालं आणि निर्धास्तही. ध्येय निश्चित असेल मार्ग ठरला असेल तर प्रवास हा नक्कीच आनंददायी होतो .तसा आद्याचा हा प्रवास आज( म्हणजेच दहावीच्या निकालाचा दिवशी ) एका टप्प्यावर आला. दहावीतील यश हे त्यांचं पहिलं फळ.
दहावी म्हणजे सगळं काही अजिबातच नाही. औपचारीक शिक्षण हा आयुष्याचा एक छोटा भाग आहे.चांगला माणूस बनणं हे ध्येय आणि त्यासाठी योग्य सहप्रवासी, मार्गदर्शक भेटणं हेही नशिबच. तसं आद्याला या प्रवासात मिळत गेलं . तिचे नवीन शिक्षक, शिक्षिका,मित्र-मैत्रिणी , मावशी, बस ड्रायव्हर काका ...अगदी कुटुंब प्रमुखाचा पासून (अर्थात केकरे मॅम आणि सर) ते सर्वच TCH family तिची आपली झाली. मुलांच्या जीवनात सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे शालेय जीवन तिथला प्रत्येक क्षण प्रत्येक कण हा त्यांच्या कणाकणात भिनत जातो ,त्यांना घडवीत जातो .या शालेय अभ्यासक्रमा सोबतच तीने भरतनाट्यम हा शास्त्रीय नृत्यप्रकार शिकायला सुरुवात केली. आणि तिच्यासाठी कलेचं एक नवीन दालन उघडलं गेलं. शाळेतील नृत्य स्पर्धाअसो, ड्रामा असो ,क्राफ्ट असो,वार्षिक संमेलन, पथनाट्य, संगीत, खेळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रोजेक्ट या सर्वात ती भाग घेत राहिली .मुलांना अगदी बालवयापासून दिला जाणारा प्रोजेक्ट (स्वतः किंवा कधीकधी आई वडिलांच्या मदतीने करावयाचा प्रकल्प) हा तर TCHचा आत्माच. classroom मधे दिले जाणारे theory lecture सोबतच कृतीतून मिळणारे शिक्षण हे मुलांना अधिक प्रगल्भ करते. आद्याला दरवर्षी मिळणाऱ्या प्रमाणपत्र मध्ये तिचं Best In Project हे प्रमाणपत्र मला सर्वाअधिक भावलं.त्याबरोबरीनेच Best Social Girl हेसुद्धा. हो ...आद्या सर्वांची लाडकी आणि तिला सर्व प्रिय. मुलांनी केवळ स्वतःचीच नाही तर आपल्या आजूबाजूच्या, सोबत काम करणाऱ्या शिकणाऱ्या ,आपल्या प्रत्येक सहकारी, सर्व घटकांची काळजी घ्यायला हवी, सर्वांना सोबत घेऊन प्रवास करायला हवा. मग हेच सोबती आपलं आयुष्य सुंदर बनवित असतात. असं त्याचं शालेय जीवन समृद्ध बनत गेलं. दहावीचा गाजा बाजा तर नाहीच उलट या वर्षी भरतनाट्यम सोबत ओडिसी या नवीन नृत्य- विश्वात तिने पदार्पण केले.अशाप्रकारे तिचे दहावीचे वर्ष अधिकच versatile झाले बहुआयामी वगैरे म्हणण्यापेक्षा व्हर्सटाईल जरा हलका शब्द वाटतो म्हणून वापरला . आद्याच्या सगळ्या आवडी-निवडी सोबत चित्रपट पाहणेही आम्ही सोडले नाही .परीक्षा सुरू असताना देखील आम्ही टॉकीजमध्ये जाऊन सिनेमा पाहिला . तर अशी आपली आद्या . तिच्या या यशात तीने 95% नाही तर शंभर टक्के दिले असे मी म्हणेल. नव्हे तर यशाची मोजदाद अशी गुणांमध्ये मार्कसमध्ये मुळीच करू नये. Marks येतच असतात. मेहनत तर सगळी मूलं करत असतात, प्रयत्न करणे आपल्या हातात असते.विद्यार्थ्यांनी आनंदाने अभ्यास करून आपल्या सर्वस्व द्यावे .बास ,हेच महत्त्वाचे.मी आद्याला एक संस्कृत सुभाषित नेहमी ऐकवायची. सुखार्थिनः कुतो विद्या विद्यार्थिनः कुतः सुखम् ।
सुखार्थी वा त्यजेत्विद्यां विद्यार्थी वा त्यजेत् सुखम् । तिनेही हे पक्के मनावर घेतले, आणि करून दाखवला.यापुढेही ती तिची अशीच वाटचाल होवो. क्षेत्र कोणतेही असो ,गुण किती का मिळेनात, ती अशीच गुणवान राहो, अशा तिला माझ्याकडून आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा,आणि आशिर्वाद. तिच्या यशात सहभागी सर्व शिक्षकांना मानाचा मुजरा. त्यांच्याप्रति हृदयापासून कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडीच. आप्तजणांचे, कुटुंबियांचे आभार म्हणण्याइतकी आपले कुटुंब संस्था औपचारिक करायला नकोच. संस्कारांचा वारसा त्यांच्याकडून आल्यामुळेच पुढील पिढी सुसंस्कृत होते आणि त्यामुळे समाजही . आजवर आणि आजही तिच्या सदैव पाठीशी राहून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करून आज हा क्षण सुंदर बनवला ,असे आपण सर्व स्वकीय. Love you all. ❤ तिच्या नजरेतून हे जग पहाताना ,हे जग असेच सुंदर राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना !🙏
आद्याची आई